नागपूर महानगरपालिका निवडणूक तयारीला वेग, वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवार निवडीबाबत स्पष्ट निर्देश..

Dec 22, 2025 - 11:50
Dec 23, 2025 - 15:06
 0  2
नागपूर महानगरपालिका निवडणूक तयारीला वेग, वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवार निवडीबाबत स्पष्ट निर्देश..

 नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर मनपा निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक रणनीती, उमेदवार निवड आणि पक्षसंघटन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

           यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. नागपूर महानगरपालिकेतील आगामी निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून त्यासाठी प्रत्येक पातळीवर तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उमेदवार निवडताना घाई न करता सखोल विचार करूनच उमेदवारी द्यावी, असा स्पष्ट सल्ला नेत्यांकडून देण्यात आला.

           जनतेत काम करणारे, स्वच्छ प्रतिमा असलेले आणि संघटनात्मक ताकद असलेले उमेदवार मैदानात उतरवावेत, यावर बैठकीत भर देण्यात आला. मागील निवडणुकांतील अनुभव, स्थानिक प्रश्न आणि मतदारांचा कल लक्षात घेऊन रणनीती आखण्याचे निर्देश देण्यात आले. नागपूर शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या हे निवडणुकीचे मुख्य मुद्दे असतील, असेही सांगण्यात आले.

            भाजपकडून तळागाळात जाऊन संपर्क वाढवण्यावर भर देण्यात येणार असून संघटन मजबूत करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात नागपूर मनपा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow